राष्ट्रवादीने नाचवले तृतीयपंथी

भिवंडी,दि.२९(वार्ताहर)-दररोज होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भिवंडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गाण्याच्या तालावर चक्क तृतीयपंथी नाचवले. चले गरीबी हटाने, गरीबो को ही हटा दिया, ‘हर आदमी कि जेब हो गई है सपाचट’ चक्रव्यूह या हिंदी चित्रपटातील या गाण्यावर तृतीयपंथी नाचले तर दुचाकीला श्रद्धांजली वाहून प्रांत अधिकार्‍यांना प्लास्टिकची वाहने भेट देण्यात आली. हे अनोखे आंदोलन भिवंडी शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिलांसह अनेक तृतीयपंथीही सहभागी झाले होते. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आज भिवंडीतील स्वर्गीय आनंद दिघे चौकातून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात निघालेला मोर्चा प्रांत कार्यलयावर भर उन्हात धडकला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात तृतीयपंथींना रस्त्यावर नाचवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर महाग झाल्याने आता आम्हाला कोणी भिकही देत नाही त्यामुळे आम्ही या आंदोलनात सहभागी झाल्याचे तृतीयपंथींकडून सांगण्यात आले.