राणेंच्या उमेदवारीने शिवसेनेत कुरबुरी

कल्याण,दि.७(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौरपदाची माळ नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या विेशनाथ राणे यांच्या पत्नीला दिल्याने, शिवसेनेतील निष्ठावंत नाराज झाले आहेत. महापलिका निवडणुकीत कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राणे यांच्या पत्नीला शिवसनेने उमेदवारी दिली. तसेच राणे यांना स्वीकृत नगरसेवकपदही बहाल केले. त्यानंतर आता महापौरपदाची माळही त्यांच्याच गळ्यात घातल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसेनेत ठाणे जिल्ह्यातील नेतृत्त्वाकडून पक्षात नव्याने आयाराम झालेल्यांवर जास्तच मेहेरनजर दाखवली जात असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. आम्ही केवळ वर्षानुवर्षे हातात झेंडेच धरायचे का अशा संतप्त प्रतिक्रिया आता येत आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेतून अनेक नावे चर्चेत होती. यामध्ये कल्याण शहरप्रमुख विेशनाथ भोईर यांच्या पत्नी नगरसेविका वैशाली भोईर, माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या पत्नी शालिनी वायले, माधुरी काळे, डोंबिवली शहरप्रमुख आणि सभागृह नेते राजेश मोरे यांच्या पत्नी भारती मोरे आदींचा समावेश होता. असे असतांनाही डोंबिवलीतील कोकणी मतदारांवर डोळा ठेऊन कॉंग्रेसमधून सेनेत आलेल्या विेशनाथ राणे यांच्या पत्नीला महापौर पदाची उमेदवारी देण्यात आली. डोंबिवली विधानसभा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे येथील मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. डोंबिवलीत कोकणी मतदारांची संख्या जास्त असून याचा फायदा रवींद्र चव्हाण यांना होत आलेला आहे. आगामी काळात डोंबिवली विधानसभा आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने कोकणी मतदारांची मते ही निर्णायक ठरू शकतात. तसेच विेशनाथ राणे यांच्या नावाची डोंबिवली विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणूनही चर्चा सुरु आहे. कोकणी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच यंदाचे महापौरपद हे विनिता राणे यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीतही शिवसनेनेला होणार आहे. विनिता राणे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून सभागृहात त्यांचे आतापर्यत काहीच कर्तुत्व पाहायला मिळाले नाही. त्यामुळे केवळ पतीच्या नावावर मिळालेल्या महापौरपदाला त्या किती न्याय देतील, हे येणारा काळच ठरवेल.