रस्त्याचे खड्डे बुजविण्याची रक्कम झाली तिप्पट!

उल्हासनगर,दि.२३(वार्ताहर)-उल्हासनगर शहरातील खड्डे बुडविण्यासाठी तातडीच्या कामांसाठी ५ः२:२ अंतर्गत ४.५६ करोडचे वादग्रस्त कंत्राट रद्द झाले होते. परंतु आता हेच कंत्राट तिप्पटपेक्षा जास्त म्हणजे १३.३५ करोडने त्याच ठेकेदारांना मिळणार आहे. या कंत्राटामुळे शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गणेशोत्सव व चालिया सण लक्षात घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने रस्त्यातील खड्डे बुडविण्याचे काम मंजूर केले. या मंजुरी अंतर्गत तातडीच्या कामासाठी ४.५६ करोडचे कंत्राट झापी व जयभारत कंस्ट्रक्शन, साई सिद्धनाथ या कंपनींना मिळाले होते. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता या कामाला मंजुरी दिल्याचे प्रसिद्धीमाध्यमांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कडाडून विरोध केला. सोशल मीडियावरदेखील प्रशासनाच्या या निर्णयाची टीका करण्यात आली. अखेर मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हे कंत्राट रद्द केले. यानंतर मनपाने प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी ई-टेंडरिंगचा निर्णय घेतला. शहरातील व शहराबाहेरील चांगल्या कंत्राटदारांना कंत्राट मिळावे हा ई-टेंडरींगचा हेतू होता, मात्र वरील कंत्राटदारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही हा कंत्राटदारांनी निविदा भरली नाही. त्यामुळे प्रभाग समिती १ मध्ये १. २३ करोडचे कंत्राट आता २.९१ करोडला झापी या कंपनीला १३५.९९ टक्के अधिक दराने मिळणार आहे. प्रभाग २ मध्ये १.८० करोडचा कंत्राट आता ४.२८ करोडला जयभारत कंपनीला १३६.८० टक्के अधिक दराने मिळणार आहे. प्रभाग ३ मध्ये १.०९ करोडचा कंत्राट आता २.५८ करोडला झापी कंपनीला १३५.९९ टक्के अधिक दराने मिळणार आहे. प्रभाग ४ मध्ये १.५ करोडचा कंत्राट आता ३.५८ करोडला साई-सिध्दनाथ कंपनीला १३८.५ टक्के अधिक दराने मिळणार आहे. रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी पूर्वी मंजूर केलेल्या रक्कमेपेक्षा तिप्पट रक्कम वाढविल्यामुळे शहरातील रस्त्यांची लांबी वाढली आहे की खड्डे वाढले आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ज्या ठेकेदारांवर आक्षेप आहेत त्यांनाच पुन्हा कंत्राट का मिळते, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेते जमनू पुरूसवानी व अन्य राजकीय नेत्यांनी या कंत्राटाला विरोध केला आहे. मनपाचे मुख्य अभियंता राम जयस्वाल यांनीदेखील या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली असून सर्व तपशील आयुक्तांना दिला असल्याचे सांगितले आहे.