रक्षाबंधनालाच भाऊ-बहिणीचा मृत्यू

ठाणे,दि.27(वार्ताहर)-मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुले जागीच ठार तर आईवडील गंभीर जखमी झाले आहेत.
शहापूर तालुक्यातील आवरे या गावातील प्रकाश घरत हा आपल्या पत्नीसोबत दोन मुलांना घेऊन मुंबई -नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून चालला होता. मुंबई नाशिक- महामार्गावर पडलेले खड्डे चुकवत असतांना त्याची बाईक खड्यात आदळून पडली आणि पति-पत्नी रस्त्याच्या बाजूला पडले तर गाडीवर बसलेला 10 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी रस्त्याच्या मधोमध पडली त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून येणार्‍या अवजड वाहनाने दुचाकी आणि मुलांना चिरडले. या अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाठीमागून येणारी गाडी ही कोणती होती तिचा शोध पोलीस घेत आहेत.दरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावर मागील दोन महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य असून संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे तर या निष्पाप बालकांचा जीव केवळ खड्ड्यांमुळे झाला असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संवेदनशील नागरिकांकडून केली जात आहे.