युथ पार्क उभाराल पण सुरक्षेचे काय?

कल्याण,दि.१(कुणाल म्हात्रे)-अस्तित्वात असलेल्या उद्यानांच्या दुरवस्थेमुळे कल्याण डोंबिवलीकरांच्या पैशांची फक्त उधळपट्टी झाल्याची बोंब होत असताना यंदाच्या अर्थसंकल्पात युथ पार्कसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा पार्क देखभाल आणि सुरक्षिततेअभावी प्रेमी युगुल, मद्यपी आणि असामाजिक तत्वांना आंदणच मिळणार असल्याची टीका आता नागरिकांमधून होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक नवीन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे युथ पार्क प्रकल्प. या प्रकल्पासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली आहे. एखाद्या शहराच्या सुंदरतेत उद्यानं मोठी भर घालत असतात. यासाठी संबंधित शहरातील महापालीकेच्या वतीने मोठा प्रमाणात निधी खर्च करून भली मोठी उद्यानं, नाना नानी पार्क उभारण्यात येतात. उद्यानांचे उद्घाटनदेखील मोठ्या थाटामाटात लोकप्रतिनिधी करत असतात. मात्र काही दिवस या उद्यानांची निगा व्यवस्थित राखली जाते, यानंतर या उद्यानांकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच होते. अशीच दुरावस्था झालेल्या उद्यानं आणि नाना नानी पार्क यांची संख्या कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांमध्ये खेळणी बसविण्यात येतात. मात्र सध्या अनेक उद्यानांची खेळणी तुटलेली आहेत. आता काही दिवसांतच शाळांच्या वार्षिक परीक्षा संपून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतील तेव्हा या विद्यार्थ्यांना खेळायचे कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या जीवनात विरंगुळा म्हणून अनेक ठिकाणी नाना नानी पार्क उभारण्यात आले खरे मात्र या नाना नानी पार्कची देखील अनेक ठिकाणी दुरावस्था पाहायला मिळते. उद्यानं आणि नाना नानी पार्क याठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणींचे घोळके, प्रेमी युगुले, यांचा वावर पाहायला मिळतो. प्रेमी युगुलांचे चाळे पाहून महिलावर्ग, लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांना मान खाली घालत निमूटपणे काढता पाय घ्यावा लागतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी हे उद्यानं अथवा नाना नानी पार्क बनविण्यात येतात त्यांनाच जर याचा वापर होणार नसेल तर काय फायदा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बहुदा यामुळे महापालिकेने तरुणांना विरंगुळ्यासाठी युथ पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे.