म्हसोबाची शिळा नष्ट करण्याचा डाव

ठाणे,दि.12(वार्ताहर) -घोडबंदर मार्गावरील वाघबीळ येथील गावकर्‍यांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू म्हसोबाची शीळा गायब करण्याचा बिल्डरचा प्रयत्न जागृत गावकर्‍यांनी हाणून पाडला असून संतप्त गावकर्‍यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार विकासकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. वाघबीळ येथे म्हसोबा देवावर या गावातील ग्रामस्थांची अपार श्रध्दा आहे. या भूखंडावर म्हसोबाची शीळा आहे. तो भूखंड एका बांधकाम विकासकाने विकत घेतला आहे. परंतु म्हसोबाची शिळा असलेल्या परिसरात त्याने विकास करायचा नाही अशी गावकर्‍यांनी अट घातली होत. तरीही 7 जून रोजी विकासकाने म्हसोबाच्या शिळेवर सिमेंट कॉंक्रिट टाकून ती बुजवून टाकली होती. त्याची माहिती गावकर्‍यांना मिळताच ते संतप्त झाले. स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा यांच्या नेतृत्वाखाली गावकर्‍यांनी शिलेवर टाकलेले कॉंक्रिट दूर करून म्हसोबा देवाची विधीवत पूजा केली. गावकर्‍यांच्या श्रध्दास्थानालाच गाढून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या विकासकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गावकरी गेले होते. परंतु त्यांनी तक्रार घेतली नाही. अखेर भाजपाचे खासदार कपिल पाटील आणि अर्चना मणेरा यांनी कासारवडवली पोलिसांबरोबर चर्चा केल्यानंतर त्या विकासकाच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. भाजपाचे खा. पाटील आणि नगरसेविका मणेरा यांनी पुढाकार घेतल्यामुळे वाघबीळ गावाचे ग्रामदैवत लुप्त होण्यापासून वाचल्याबद्दल या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यापुढे म्हसोबा शिळेचे रक्षण गावकरी करतील असा निर्धार व्यक्त केला आहे.