मोहंडूळच्या महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती

भिवंडी,दि.५(वार्ताहर)-वर्षानुवर्षे जंगलातून सरपण जमा करुन चूल पेटविल्यानंतर असह्य धुरातच स्वयंपाक करणार्‍या मोहंडूळ येथील २७४ भगिनींची चुलीच्या धूरापासून सुटका झाली आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून महिलांना मोफत गॅस मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून विशेषतः दुर्गम भागातील गरीब कुटुंबांमध्ये गॅसवाटप करण्यावर खासदार पाटील यांनी भर दिला आहे. त्यानुसार मोहंडूळ परिसरातील काही कार्यकर्त्यांनी तेथीज महिलांची व्यथा मांडली होती. त्यांना वर्षानुवर्षांपासून जंगलातील सरपणावर स्वयंपाक करावा लागत असल्याकडे लक्ष वेधले होते. गॅसवाटप वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर आदी उपस्थित होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या महिलांनी परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे.