मुरबाड औद्योगिक क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा?

मुरबाड,दि.१९(वार्ताहर)-मुरबाड औद्योगिक क्षेत्राची स्थापना होऊन सुमारे तीस बत्तीस वर्षाचा कालावधी लोटला असताना उन्हाळा संपुन पावसाळ्याचे पंधरा दिवस उलटले मात्र मुरबाड एम.आय.डी.सी.तील कारखानदार व कामगार यांना पाणी टंचाईच्या झळा बसत असून आजही पाणी पुरवठा विभागाकडून अपुर्‍या प्रमाणात आणि अनियमित अशा स्वरुपात होणार्‍या पाणी पुरवठ्यामुळे मालक वर्ग व कामगार वर्ग पुरता हैराण झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी नव्हे अशा पाणी टंचाईने मुरबाड शहरवासी हैराण होत असताना अवघ्या दिड वर्षाच्या नगर पंचायतीने शहरातील शहर वासीयांची तहान भागवण्यासाठी वर्षभरापूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत मुबलक पाणी साठा उपलब्ध केल्याने आज मुरबाड शहरातील दरवर्षीची भिषण स्वरुपातील असलेली पाणी टंचाई दूर झाली. गेल्या तीस वर्षापासून पाचसहाशे कारखानदारांकडुन अनेक प्रकारचे कर वसुल करणा-या एम.आय.डी.सी.महामंडळाला स्वत:चा बारवी धरणासारखा जलसाठा असताना कारखानदार व कामगारवर्गाला जून महिन्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही खेदाची बाब असून संबंधित खात्याचे लाखो रुपयांची पगार घेणारे अधिकारी व हजारो रुपयांचे पगारं घेणारे कर्मचारी कसल्या नियोजनांत गुंतले आहेत? या अनैसर्गिक पाणी टंचाईला जबाबदार कोण? असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला असून बारवी धरणातील साठा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असुनही हे पाणी नक्की कोणासाठी आहे. मुरबाड एम.आय.डी.सी.त तर भीषण पाणी टंचाई आहे. मग हे पाणी या अन्य कोणा कोणासाठी आहे? याशिवाय ही पाणी टंचाई कधी संपेल या चिंतेने कारखानदार मालक मात्र संभ्रमात पडले आहेत.