मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन

मिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर ‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मिरा भाईंदर का उपाशी’, ‘मिरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलन केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीएच्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख आणि त्यासाठी तरतूद करण्यात आली नसल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्याने मिरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मिरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या सहा महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे ओशासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.