महापौरपदी पंचम कलानी यांची बिनविरोध निवड

उल्हासनगर,दि.28(वार्ताहर)-आज झालेल्या महापौर निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या पंचम कलानी बिनविरोध निवडून आल्या आहेत. साई पक्षाच्या बंडखोर उमेदवार ज्योती भाटिजा आणि भाजपच्या डिंपल ठाकूर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पंचम कलानी यांना विजयी घोषित केले. सत्ताधारी भाजप-टी ओ के-साई पक्षाच्या मीना आयलानी यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. नंतरच्या सवा वर्षसाठी पंचम कलानी यांची निवड उभय पक्षांच्या समझोत्यानुसार ठरलेली होती. मात्र अचानक साई पक्षाच्या नगरसेविका ज्योती भाटिजा यांनी बंडखोरी करीत महापौरपदाचा अर्ज भरला. सत्ताधारी पक्षातील फुटीचा फायदा विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने घेतला आणि ज्योती भाटिजा यांना समर्थन देण्याची घोषणा केली होती. यानंतर साई पक्षाचे सात नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याने आपल्या चार नगरसेवकांना व्हीप जारी करून ज्योती भाटिजा यांना मतदान करण्याचे पत्रक काढले मात्र पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले त्यामुळे शिवसेनेला आपला पराभव दिसू लागला लागला होता. यानंतर शिवसेना नगरसेवक आणि साई पक्षाचे बंडखोर नगरसेवक यांची बोलणी देखील फिस्कटली असल्याची चर्चा काल रात्रीपासून सोशल मीडियावर सुरू होती. आज सभागृहात भाजप-टी-के आणि साई पक्षाचे नगरसेवक एकत्रित बसले तेव्हाच शिवसेनेचा डाव फसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते, पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर, मनपा आयुक्त गणेश पाटील यांनी कामकाज सुरुवात केल्यानंतर काही वेळातच ज्योती भाटिजा आणि डिंपल ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पंचम कलानी यांना विजयी घोषित करण्यात आले. आज महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने स्वतः राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पंचम कलानी यांचे पती आणि टी ओ केचे प्रमुख ओमी कलानी आणि भाजप-साई-टी ओ के पक्षाच्या अनेक नेत्यांनी मनपा मुख्यालयात हजेरी लावली होती तर भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेल्याने काही दिवसांपासून शहरातील वातावरण चांगलेच तापले होते, ही परिस्थिती पाहता मुख्यालयात प्रचंड पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.