महापरिनिर्वाणदिनी जनसागर उसळला!

ठाणे,दि.6(वार्ताहर)-ओखी वादळाचे सावट, पावसाची संततधार सुरू असतानाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 वा महापरिनिर्वाणदिन भक्तीभावाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहराच्या विविध भागातून मध्यरात्री भीमसैनिक हातात मेणबत्ती प्रज्वलीत करून आले होते. ओखी वादळामुळे शहराच्या सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू होती. त्याची तमा न बाळगता भीम अनुयायींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.तसेच ठाणे रेल्वे स्थानकासमोरील पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. शाहू, फुले, आंबेडकर या सामाजिक संघटनेतर्फे सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खूंनी बुध्दवंदना त्रिशरण पंचशीलेचे पठण केले. हजारो भीम अनुयायांनी यावेळी बाबासाहेबांना अभिवादन केले. आज सकाळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केले. काल रात्री पूर्व ठाण्यातील आनंदनगर येथे स्थानिक नगरसेवक नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शहराच्या विविध भागातही बाबासाहेबांना त्यांच्या अनुयायांनी अभिवादन केले.