मल्टिप्लेक्समध्ये मनसेची तोडफोड

कल्याण़,दि.2(वार्ताहर)-ऑगस्टपासून मल्टीप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील असे निर्देश राज्य सरकार आणि कोर्टाने दिल्यानंतरही कल्याणातील सर्वोदय मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये आदेश पायदळी तुडवण्यात आले. मिळालेल्या तक्रारीनंतर मनसेने धाव घेत मॉलमध्ये तोडफोड केली तर त्यानंतर कार्यकर्त्यांनी मेट्रो मॉलकडे मुसंडी मारली. मात्र याची माहिती मिळताच मॉलचे दरवाजे बंद करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मल्टीप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांवर वाढीव किमत आकारण्यात येत असल्याने जुलै महिन्यात मनसेने सर्वत्र आंदोलन छेडले होते. विधानसभेत मल्टीप्लेक्सचा मुद्दा गाजल्यानंतर शासनाने बाहेरचे खाद्य पदार्थ घेऊन जाता येणार आहे असा निर्णय देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र आज 2 ऑगस्ट उजाडले असून मल्टीप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई केली तर तेथे विक्रीस ठेवण्यात आलेल्या पाण्याची बॉटल 40, दोन पॉपकॉर्न आणि कोकचे 750 रुपये, पाच प्लेट सामोसा 400 रुपये अशी वाढीव किंमत आकारण्यात येत असल्याची तक्रार कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांना आली. या तक्रारीनंतर मनसेचे माजी आमदार आणि प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, माजी नगरसेवक अनंता गायकवाड आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सर्वोदय मॉलमधील मल्टीप्लेक्स मध्ये धाव घेत मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला धारेवर धरले. याठिकाणी वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी येथील सामनाची तोडफोड केली. तसेच जास्त पैसे आकारलेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत करण्यात आले. यानंतर मनसैनिकांनी मेट्रो मॉलला धाव घेतली. मात्र मनसेच्या या आंदोलनाची पोलिसांना आधीच खबर लागल्याने मॉलचे दरवाजे बंद करत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपानंतर मॉल व्यवस्थापनाशी चर्चा करत सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच खाद्यपदार्थ विकण्याची ताकिद मनसेने व्यवस्थापनाला दिली. मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थाची वाढीव किंमत आकारली जाते याबाबत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता. विधानसभेत हा विषय मांडण्यात आला. शासनाने या विषयावर निर्णय घेत मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थ मूळ किंमतीत विकावे तसेच बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून हा निर्णय मल्टीप्लेक्सने अंमलात आणणे आवश्यक होते. आज आम्ही मल्टीप्लेक्सची पाहणी केली असता वाढीव किंमत आकारण्यात आली होती. आम्ही आवाज उठवल्यानंतर मूळ किंमत आकारून नागरिकांचे पैसे परत करण्यात आले असल्याचे मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितले.