मराठी शाळांकडे ओढा वाढवणारी ‘जत्रा इंग्रजीची’

भिवंडी,दि.२७(वार्ताहर)-कमालीची घटती पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी खारबांव येथील मराठी शाळेत दोन दिवसीय ‘इंग्लिश कार्निव्हल’ अर्थात
‘जत्रा इंग्रजीची’ या महोत्सवाचे आयोजन केले होते. ग्रामीण परिसरासह सर्वत्र मराठी भाषिक विद्यार्थी व पालकांमध्ये खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याने भविष्यात मराठी शाळाच बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या महोत्सवाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने परिसरातील मराठी शाळांमध्ये पट संख्या वाढणार आहे. भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभाग केंद्र वडूनवघर व लर्निंग स्पेस फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयातील भाषिक कलाविष्कार नाविन्यपूर्ण असावा यासाठी २१ ते २२ मार्च असे दोन दिवशीय इंग्लिश कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जि.प.सदस्या रत्ना तांबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या योगिता पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते नागेश मुकादम, सरपंच मोहना पाटील, उपसरपंच मनोज म्हात्रे, शाळा व्यवस्थापक हरिचंद्र तरे, केंद्र प्रमुख विजया गवळी, माजी उपसरपंच अशोक पालकर, उद्योजक ओम मुकादम, प्रशांत घागस यांच्यासह शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवात पायगाव, खार्डी, मालोडी, वडूनवघर, बंगलापाडा, खारबांव, भोयाचापाडा, नाईकपाडा, पेंढरीपाडा, रावत्याचापाडा आदी जिल्हा परिषद शाळांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या इंग्लिश कार्निव्हल महोत्सवात मोठ्या हिरिरीने भाग घेऊन आपल्यामध्येही इंग्रजी शिक्षण घेण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. तर काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी फाड फाड इग्लिश बोलून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. यामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये जो इंग्रजी शिक्षणासाठी खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा आहे तो आता जनजागृतीमुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाढेल, असा विेशास केंद्र प्रमुख विजया गवळी यांनी व्यक्त केला आहे.