मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे राज्यस्तरीय संमेलन उत्साहात

अंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-कवी संमेलन, परिसंवाद चर्चासत्रे, पुरस्कार वितरण, चारोळ्या यासारख्या भरगच्च कार्यक्रमांच्या मेजवानीने मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे ५५ वे राज्यस्तरीय संमेलन उत्साहात पार पडले. शनिवार २४ आणि रविवार २५ जून असे दोन दिवस चाललेल्या संमेलनाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे आदी उपस्थित होते. पत्रकार श्रीकांत खाडे यांना श्रीकांत पालेकर स्मृती पुरस्कार तसेच अजित म्हात्रे, प्रशांत मोरे, गिरिष त्रिवेदी, शरद पवार, गणेश गायकवाड आदी पत्रकारांना स्वागताध्यक्ष दयानंद चोरघे आणि उपस्थितांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पहिल्या दिवशी वडवली येथील ब्राम्हण सभेच्या सभागृहात झालेल्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राच्या क्षात्रतेजाचा वारसा सांगताना आप्पा परब यांनी वीरत्वाचा इतिहास समोर उभा केला. कोहोजगाव येथील कृष्णा मॅरेज सभागृहात दिवसभर झालेल्या कार्यक्रमात दुसर्‍या दिवशी महाराष्ट्राच्या प्रबोधनात संत साहित्याचे योगदान या विषयावर बोलताना संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनी संत परंपरा विषद केली. महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतांच्या काळातच मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संतपरंपरेचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनी व्यक्त केले. संतांच्या विचारांनी प्रेरित होत कीर्तनकार, शाहिर यांनीच महाराष्ट्राला शहाणे केले. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संत परंपरा अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्याच्या साडे सातशे वर्षांच्या इतिहासात साडे चारशे वर्ष हे संत साहित्याचे आहेत. त्यामुळे मराठी साहित्यही संतांशिवाय अपूर्ण आहे. मागासवर्गीयांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी सर्वप्रथम संतांनीच प्रयत्न केले. भाषा, धर्म आणि पंथांच्या सर्व चौकटी संतांनी मोडल्या असे पवार यांनी नमूद केले. आपण संत साहित्यापासून दूर जात असून खरा जीवनाचा अर्थ तेथेच आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दुपारच्या सत्रात ‘ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची दशा आणि दिशा’ या परिसंवादात स्थानिक पत्रकार गिरिष त्रिवेदी आणि पत्रकार सागर नरेकर यांनी जिल्ह्याच्या स्थितीचा लेखजोखा मांडला. ठाणे जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या तालुक्यांत पाण्यासाठी वणवण आहे. त्यामुळे येथील नियोजन बिघडल्याचे जाणवत असल्याचे समोर येत असल्याचे सागर नरेकर यांनी सांगितले. तर जिल्ह्याचा इतिहास समृद्ध असून अनेक विषयात जिल्ह्याने प्रगती केली आहे. त्यामुळे दशा असली तरी दिशा देण्याची कुवत या तालुक्यांत असल्याचे त्रिवेदी यांनी यावेळी सांगितले. नंतर निमंत्रितांचे कवि संमेलनही पार पडले. शेवटच्या सत्रात ‘वृत्तपत्र लेखक समाजातील जागल्या’ या विषयावर परिसंवाद पार पडला. प्रा. अरुण मैड, कवी किरण येले, कालिदास देशमुख, जैतू मुठोळकर, अंबरनाथचे सुयोग मंडळ आदींचा भाजप जिल्हाध्यक्ष दयानंद चोगरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, समन्वयक राजेश नाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किसनराव तारमळे, नगरसेवक तुळशीराम चौधरी, नगरसेविका अनिता आदक, भाजपा जिल्हा सचिव संजय आदक आदींच्या हस्ते विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाला राज्यभरातील वृत्तपत्र लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.