भोईर दाम्पत्याच्या सेनाप्रवेशामुळे भाजपात जल्लोष; सेनेत नाराजी

भाईंदर,दि.९(वार्ताहर)-यंदाच्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पोर्शभूमीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राजू भोईर व नगरसेविका भावना भोईर या दांपत्याला प्रभाग १६मध्ये भाजपातून उमेदवारी देण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले होते. त्यामुळे भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांत तीव्र नाराजी असतानाच भोईर दांपत्याने सेनेत प्रवेश केला. त्यामुळे रस्त्यातील काटा दूर झाल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर सेनेतील इच्छुकांवर त्यांच्या प्रवेशामुळे गडांतर आल्याने ते नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वीच्या प्रभाग ४१मधील भोईर दांपत्याने बहुजन विकास आघाडीच्या तिकिटावर २०१२मधील निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाल्याने सत्तेतील समावेशात त्यांनी यशस्वी राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली. आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीला तर नंतर सेना-भाजपाला सत्तास्थापनेत पाठिंबा देत महत्वाची पदे मिळविली. परंतु, युतीच्या सत्ताकाळात भावना भोईर यांना महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद देण्याचे निश्चित करुनही भाजपाचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांनी सभापतीची माळ आपली वहिनी डिम्पल मेहता यांच्या गळ्यात घातली. यामुळे भोईर दांपत्य नाराज झाले. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी थेट बविआलाच सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु, बविआश्रेष्ठींनी स्वपक्षाचा नारा दिल्याने भोईर दांपत्याचा हिरमोड झाला. बविआने भाजपासोबत लढण्याचा निर्णय घेत अस्तित्वातील जागांपेक्षा अधिक जागांची मागणी भाजपाकडे केली. शहरात बविआचे वर्चस्व पाहता त्यांना अधिक जागा देणे भाजपाला हितावह न वाटल्याने वाटाघाटी फिस्कटल्या. त्यातच पुन्हा बविआच्या तिकिटावर निवडून येण्याची शोशती नगण्य झाल्याने भोईर दांपत्याची न घर का न घाट का, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे बविआला बाजुला सारून त्यांनी भाजपातून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचे पाठबळ मिळत असल्याने स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी भोईर दांपत्याला विरोध दर्शविल्यानंतर भाजपात भोईर दांपत्याविरोधी वातावरण निर्माण झाले. याच प्रभागातील भाजपातील उत्तर भारतीयांनी भोईर दांपत्याला भाजपातून उमेदवारी देण्यास विरोध दर्शवित भाजपा सोडण्याचा निर्धार केला होता. भाजपा आपल्याला प्रतिकूल ठरु लागल्याने भोईर दांपत्याने अखेर सेनेत प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक भाजपाईने जल्लोष केला. सेनेकडून भोईर दांपत्याला प्रभाग १६मध्ये उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पक्षातील इतर इच्छुकांच्या मनसुब्यावरच पाणी फेरण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे सेनेत नाराजी पसरली असून एकावेळी सेनेतील दोन निष्ठावंत इच्छुकांचे तिकिट भोईर दांपत्यामुखळे कापले जाण्याच्या शक्यतेने नाराजांत भावनात्मक चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना गटनेत्या निलम ढवण : भोईर दांपत्यामुळे सेनेला नक्कीच फायदा होणार आहे. भाजपाच्या बाजुने गेलेले भोईर दांपत्य सेनेकडे प्रभावित झाले. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षात कोणतीही नाराजी नाही. जे नाराज असतील त्यांची नाराजी वरीष्ठांकडून दूर केली जाईल. भाजपाचे सृष्टी मंडळ अध्यक्ष गजानन नागे : बविआचे प्रामुख्याने नगरसेवक राजू भोईर यांच्या स्थानिक पातळीवरील कार्यामुळे परिसरात नाराजीचे वातावरण आहे. त्यातच भाजपाकडून त्यांची उमेदवारी प्रभाग १६ मध्ये निश्चित झाली असती तर भाजपाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असती. परंतु, भोईर दांपत्य सेनेत गेल्याने भाजपाचे कमळ प्रभाग १६ मध्ये खुलण्याची शक्यता बळावली आहे. बविआचे मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष अविनाश गुरव : भोईर दांपत्याच्यामागे पक्ष नेहमीच उभा राहिला आहे. तरीदेखील त्यांनी पक्षाला सोडून सेनेत जाणे इष्ट समजले. त्यांच्या पक्षांतरामुळे बविआचे कोणतेही नुकसान होणार नाही. केवळ पक्षाचे नगरसेवक असणे म्हणजे पक्षाचे अस्तित्व असणे, हे समजणे गैर आहे. पक्षाने नेहमीच राजकीय ऐवजी सामाजिक कार्यावर अधिक भर दिला आहे. तो पुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्वार्थ साधणारा आमचा पक्ष नाही.