भीषण आगीत १६ गोदामे खाक

भिवंडी दि.६(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांधण्यात आलेल्या सागर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील चेक पॉईंट या गोदामाला लागलेली आग पसरून जवळची १६ गोदामे आगीत भस्मसात झाली. आज सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. भिवंडी महापालिका अग्नीशमन दलप्रमुख दत्ता साळवी म्हणाले की आगीची वर्दी आम्हांला सकाळी सव्वा दहा वाजता मिळाल्यावर आम्ही जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. सागर कॉम्प्लेक्स गोदामाजवळ येताच भीषण आग लक्षात घेऊन ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, एमआयडीसी आदी ठिकाणच्या अग्निशमनदलांना मदतीसाठी पाचारण केले. गोदाम नगरी असली तरी तेथे पाणी पुरवठ्याचा तुटवडा आहे. प्रत्येकवेळी रिकामी झालेली गाडी पाणी भरण्यासाठी भिवंडीतील जलशुद्धीकरण केंद्राजवळ यावे लागते आणि तेथून पाणी भरून पुन्हा घटनास्थळी जावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन आग विझविण्यास अडथळे निर्माण होतात. ही आग भीषण असल्याने ती विझविण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही, असेही श्री.साळवी यांनी सांगितले. आगीच्या धुरामुळे आग विझविणार्‍या जवानांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. धुरामुळे आजूबाजुला राहणार्‍या ग्रामीण भागातील रहिवाशांचे डोळे चुरचुरणे, मळमळ, घरात काजळी येणे, श्‍वासोच्छवासाचा त्रास होणे अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. बाजूच्या गोदामांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ४० ते ५० लोक अडकलेले होते त्यांना इतर गोदामांमध्ये तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अग्नीशमनदलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमनदलाच्या अधिकार्‍यांनी दिली. पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीवर चांगले नियंत्रण ठेवले. लाखो गोदामे या भागात असून स्वतंत्र अग्निशमनदल येथे नाही एवढेच नव्हे तर पाणी पुरवठ्याची सोय देखील नाही त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या अग्निशमनदलावर नेहमी अवलंबून रहावे लागते.