भीषण आगीत कंपनी खाक

कल्याण,दि.१४(वार्ताहर)-डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील किचन क्राफ्ट नामक कंपनीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील जवळपास सर्वच माल जाळून खाक झाला असता तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेजारीच असलेल्या वृद्धाश्रमातील वृद्धांचा धुरामुळे कोंडमारा झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पाच बंबांसह काही पाण्याचे टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आरती केमिकल्स कंपनीच्या शेजारीच ही किचन क्राफ्ट कंपनी आहे. आगीमुळे एमआयडीसी परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ येथे सोनारपाड्याजवळ संदीप जोशी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. गेली दहा वर्षे सुरू असलेल्या कंपनीत सध्या बारा कामगार कार्यरत आहेत. जर्मन देशातून प्लायवूडचा कच्चा माल आणून या कंपनीत स्वयंपाक घरातील सजावटीसाठी लागणार्‍या फर्निचरची निर्मिती केली जाते. सोमवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट उठून आगीच्या मोठ्या ज्वाला सर्वत्र पसरल्या या आगीची झळ बाजूलाच लागून असलेल्या आरती केमिकल कंपनीलाही बसली. यामुळे तेथील कामगारांनी या कंपनीतील केमिकलने भरलेले ड्रम तत्काळ बाहेर काढल्याने संभाव्य मोठी हानी झाली नाही. या आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच बंबांसह पाण्याच्या टँकरने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरू केले. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ही आग इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या कंपनीच्या शेजारी लागून असलेल्या इमारतीच्या टेरेसवर आर.के.सेवा वृद्धाश्रम आहे. तेथील वृद्धांचा आगीच्या धुरामुळे कोंडमारा झाला. त्यातील तीन वृद्धांना पोलिसांच्या मदतीने जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.