भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ११ जण ठार

डोंबिवली,दि.२७(वार्ताहर)-गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात डोंबिवलीतील एकाच भाविक कुटुंबातील ११ जणांवर काळाने घाला घातला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व भाविक गुजरातला देवदर्शनासाठी जात असताना सिलेंडरने भरलेला ट्रक व जीपची आमनेसामने धडक बसून ड्रायव्हरसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातातून एक लहान मुलगा बचावला आहे. डोंबिवली पूर्वेतील रघुवीरनगर परिसरात नीळकंठ पूजा इमारतीत राहणारे शशिकांत वि. शहा (५६) पत्नी-सोनल उर्फ रिटा (५२), मुलगी-धरा (२५), टाटा लाईन रोडला निशीगंध बिल्डिंगमध्ये राहणारी किरण कमलेश शहा (४९), मुलगी-जिनाली (२०) मुलगा-नेमील (१७), राजाजी पथावर वीणा बिल्डिंग (मद्रासी बिल्डिंग) मध्ये राहणारे हितेश त. शहा (५२), पत्नी-विभा (४८), भाचा-नंदीप (२२), जैशुबेन दिनेश शहा (रा. वडोदरा) भारतीबेन किशोर शहा (रा. सूरत) आणि ड्रायव्हर महंमद रसूल मलिक (५०,रा. बडोदा) अशी या भीषण अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. यातील शशिकांत शहा यांचा मुलगा जैनम हा अपघातातून बचावला असून त्याला सूरतकडे रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कोमात गेलेला किरण शहा हिचा मुलगा जैनम (१७) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे शहा कुटुंबीयांचे निकटवर्तीय अशोकभाई शहा यांनी सांगितले. या वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्‍या कुटुंबाने गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेल्या पलिताना मंदिराकडे देवदर्शनासाठी जाण्याचा बेत केला होता. जैन समाजाचा पर्युषण काळ शनिवारी समाप्त झाल्यामुळे शहा कुटुंबीय रेल्वेने गुजरातमधील भावनगर येथे पलिताना मंदिराकडे देवदर्शनासाठी निघाले. यात्रेला निघालेले हे कुटुंबीय शनिवारी खूपच आनंदात होते. बडोदा येथे राहणार्‍या शशिकांत शहा यांची मोठी बहीण जैशुबेन, तसेच भारतीबेन या दोघींना सोबत घेतले. तुफान ट्रॅक्स जीपने हे कुटुंब अहमदाबाद महामार्गावर असलेल्या धंधुका-बरवाला येथून भावनगरकडे निघाले. याच रस्त्यावर पहाटेच्या सुमारास जीप आणि इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडर्सने भरलेल्या ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात ड्रायव्हर महंमद मलिकसह शहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त डोंबिवलीत येऊन धडकताच निळकंठ पूजा, निशीगंध सोसायटी आणि वीणा बिल्डिंग या तिन्ही इमारतींकडे विचारपूस करणार्‍यांची रिघ लागली होती. अपघातातून बचावलेला जैनम हा घाटकोपर येथील गुरुकुल महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. जैन समाजाच्या पर्युषण काळ समाप्तीनंतर रविवारी डोंबिवलीत रथयात्रा निघाल्या होत्या. डोंबिवलीत जवळपास सहा ते सात जैन मंदिरे आहेत. अपघाताचे वृत्त सर्वत्र पसरताच जैन समाजावर शोककळा पसरली आहे. संध्याकाळी गोडधोड मिठाई जेवणाचा बेत या समाजाने संपुष्टात आणला. हे सर्व जेवण गरिबांना वाटप करण्यात आल्याचे पंकज शहा यांनी सांगितले. या प्रभागाचे नगरसेवक तथा केडीएमसीचे सभागृह नेता राजेश मोरे यांनी शहा कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केले.