भाजपाची लाट ओसरत आहे- राज

डोंबिवली,दि.27(वार्ताहर)-सरकारकडे पैसे नसतानाही नुसत्याच योजना जाहीर करत आहे. शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. सरकारचा हा खोटेपणाचा फुगा लवकरच फुटणार आहे, असा टोला देत राज ठाकरे यांनी भाजपाची लाट ओसरत असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेतील मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत राज ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवलीमधील मनसे नगरसेवकांशी संवाद साधण्याचे ठरवले. त्यानुसार आज राज ठाकरे यांनी डोंबिवलीत मनसे नगरसेवकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यानी शिवसेना आणि भाजपावर टीकेचा भडीमार करत फेरीवाला समस्येबाबत शासन आणि प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासुन दोन दिवस कल्याण डोंबिवली च्या दौर्‍यावर आहेत. एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसेने काढलेला संताप मोर्चा, मुंबई महापालिकेतील सहा नगरसेवकांचा झालेला सेनेत प्रवेश या पोर्शभूमीवर राज ठाकरे यांच्या दौर्‍याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. आज त्यांनी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांशी बैठक घेत चर्चा केली. यावेंळी नगरसेवकांनी विविध समस्या राज यांच्या समोर मांडल्या असता राज ठाकरे यांनी या बाबत सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चेमध्ये कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनी अनेक प्रश्न आणि मुद्दे राज ठाकरे यांच्या कानावर घातले. तसेच सध्याची महापालिकेची झालेली बिकट अवस्था, मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले सहा हजार ५०० कोटींचे ओशासन, एकही काम होत नसल्याने नगरसेवक म्हणून सामोर्‍या जाव्या लागणार्‍या गोष्टी अशा विविध महत्वाच्या मुद्यांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. हे सर्व मुद्दे ऐकून घेऊन मग त्यावर राज ठाकरे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सीएसआर फंडातून काही कामं करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच राज ठाकरे शनिवारी सकाळी महापालिका आयुक्त पी. वेलरासु यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना राज यांनी भारतीय जनता पक्षाची लाट आता ओसरत असून मनसे कार्यकर्त्यांनी आपला पक्ष संपला असं न समजता जोमाने कामाला लागावे जे पदाधिकारी योग्य प्रकारे काम करणार नाहीत त्यांना एक वर्षांनी पदावरून दूर केले जाईल असे संकेत केले. पुढे बोलताना राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, जनतेची कामे करा. लोकांपर्यंत पोहचा असे आदेशही राज यांनी देत कामे कशाप्रकारे करावीत याच्या सूचना दिल्या. सध्या सोशल मीडियाचे युग आहे. प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करा, असा राजमंत्रही कार्यकर्त्यांना दिला. तसेच काम न करणार्‍याला पदावरून हटविण्यात येणार असल्याचीही तंबी राज यांनी दिली. त्यामुळे मनसेतील चमकेशांचे यापुढे वांदे होणार आहेत.