भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी

भाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वाच्या निर्णयात चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच कॉंग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे कॉंग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडून पडले. कॉंग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, कॉंग्रेस आणि अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, कॉंग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, कॉंग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ.नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.