बेकायदा बांधकामे: महापौर-आयुक्तांमध्ये ठिणगी!

उल्हासनगर,दि.२(वार्ताहर)-महापौर मीना आयलानी यांनी उल्हासनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करू नये असे आदेश दिले होते मात्र कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई होणारच असे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठणकावून सांगितले. कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईचा गैरफायदा घेत अनेक दुकानदारांनी दोन-तीन मजली अनधिकृत बांधकामे केली आहेत. या बांधकामांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई बंद करावी अशी मागणी सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी केली. मात्र चर्चे दरम्यान उपमहापौर जीवन ईदनानी यांनी एका अनधिकृत बांधकामाच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपाचे अधिकारी व पथक गेले असता ते पथक परत का आले? असा सवाल केला. उपमहापौरांच्या या वक्तव्याने अनधिकृत बांधकामाचा बचाव करणारे भाजप नगरसेवक आणि सभागृह नेता जमनू पुरुस्वानी यांनी आक्षेप घेतला. आम्ही बांधकामे वाचवायचा प्रयत्न करीत आहोत आणि आपण कारवाई करण्यास सांगत आहात असा वाद उपमहापौर ईदनानी यांच्याशी घातला. यानंतर महापौर आयलानी यांनी चर्चा मध्येच थांबवून यापुढे कल्याण-अंबरनाथ रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करू नये असे आदेश दिले. या आदेशाला प्रत्युत्तर देताना आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले की अनधिकृत शहरातील बांधकामांच्या विरोधात कारवाई करणे अथवा न करणे याचे अधिकार प्रशासनाचे आहेत, २००५ साली शहरातील ८५५ अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढला. या नंतर शहरात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत असे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केले गेलेत, आजही अनधिकृत बांधकामे होत आहेत, तुम्ही यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अशी शोशती देतील का? असा सवाल नगरसेवकांना केला. याबद्दल नगरसेवकांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार असे आयुक्तांनी ठणकावून सांगितले.