बाप्पाचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून!

कल्याण,दि.६(वार्ताहर)-गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनोभावे पूजाअर्चा करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र हा परतीचा प्रवास करताना बाप्पांना देखील रेल्वेरूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागले. कल्याणमधील कचोरे कोळीवाडा येथे खाडी किनारी असलेल्या विसर्जन स्थळाकडे जाण्यासाठी गणेशभक्तांना रेल्वेरूळ ओलांडून जावे लागले. कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना रेल्वेरूळ ओलांडून जावे लागते. विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक सागरदेवी सेवक मंडळ आणि आरपीएफच्या जवानांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले. असे जरी असले तरी खुद्द गणपती बाप्पाला देखील आपला परतीचा प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडावे लागले असल्याची मजेशीर चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.