बदलापूर:२०१५पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी

बदलापूर,दि.१९(वार्ताहर)-बदलापूर शहरातील २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नगरपरिषदेने नियमित करावी अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडे केल्याची माहिती बदलापूर भाजपा शहर अध्यक्ष आणि नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली. शासनाच्या १५ एप्रिल २०१७ रोजीच्या राजपत्रान्वये एमआरटीपी कायद्यात बदल करण्यात आला असून त्यानुसार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बदलापूर नगर परिषदक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. बदलापूर शहरात अनेक नागरिकांनी खाजगी जागांवर बांधकाम करताना परवानगी न घेतल्यामुळे त्यांची बांधकामे अनधिकृत ठरली आहेत. अशा नागरिकांना तसेच सरकारी जागांवर अतिक्रमण करून बांधकाम करणार्‍या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा नगर परिषद प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याद्वारे नगर परिषदेचे उत्पन्नदेखील वाढण्यास मदत होणार असल्याने या शासन निर्णयाची कार्यवाही व्हावी, अशी मागणी केल्याचे संभाजी शिंदे म्हणाले.