बदलापूरचा अक्षय राठोड ठरला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया

बदलापूर,दि.१६(वार्ताहर)-तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अनइकुब पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५० किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळवले. त्याने तिसर्‍यांदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. गेल्या आठवड्यात तामिळनाडू येथे राष्ट्रीय अनइकुब पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. यात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ५३ किलो वजनी गटातील बदलपूरच्या अक्षय राठोडच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.यापूर्वी आपल्या वजनी गटात राष्ट्रीय विक्रम करत अक्षयने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला होता. मात्र यंदाच्या स्पर्धेतही सलग तिसर्‍यांदा अक्षयने राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. त्याने यावेळी एकूण ४५० किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला. हे करत असताना स्कॉट प्रकारात १६२.५ तर डेड लिफ्टिंग प्रकारात १९२.५ किलो वजन उचलले. त्यामुळे देशातला या वजनी गटातला त्याचाच विक्रम त्याने मोडीत काढला. या राष्ट्रीय विक्रमामुळे त्याला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाच्या किताबानेही गौरवण्यात आले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचे प्रशिक्षक कमलाकर गोडविंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे. येत्या वर्षभरात जमशेदपूर येथे होणार्‍या आशियाई स्पर्धेत त्याला खेळायचे असून रशियाच्या खेळाडूच्या नावावर असलेल्या ५०० किलोच्या विक्रमाला गवसणी घालण्याचा मानस अक्षय राठोड याने बोलून दाखवला.