बदलापुरात पाणीटंचाई विरोधात मजिप्रावर मोर्चा

बदलापूर,दि.१७(वार्ताहर)-पाणीटंचाई आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याविरोधात बदलापूरच्या नागरिकांनी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनत असून उंच इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना याचा फटका सहन करावा लागतो. यातूनच बुधवारी रहिवाशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी तात्काळ उपाययोजना करण्याचे ओशासन मिळाल्यानंतर रहिवाशांनी कार्यालयातून माघार घेतली. बदलापूरमध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे शहरात काही वर्षात उंच-उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र काही महिन्यांपासून पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. बदलापूर पश्चिमेतील मांजर्लीत असलेल्या ऑर्किड ट्रायो या इमारतीतील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयाचे प्रमुख डी.एन.बागुल कार्यालयात नसल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयातील कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुरध्वनीवरून संपर्क साधत बागुल यांनी तात्काळ पाण्याची पाहणी करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे ओशासन दिले. त्यानंतर रहिवाशांनी कार्यालयातून माघार घेतली. शहरातील उंचसखल भागात उभ्या राहिलेल्या उंच इमारतींच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दर सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद असल्याने त्याची झळ पुढील दोन ते तीन दिवस सोसावी लागते, त्यामुळे नागरिक पाणी कपातीवरही संताप व्यक्त करत आहेत.