बचावलेल्या रहिवाशांनी रात्र कुडकुडत काढली!

भिवंडी,दि.२६(वार्ताहर)-भिवंडीतील नवीवस्तीमधील इमारत दुर्घटनेत बचावलेल्या तिघा तरुणांना पालिकेकडून निवार्‍याची सुविधा न मिळाल्याने संपूर्ण रात्र बाहेर कुडकुडत काढावी लागली. इमारतीमधील सय्यद फैजन अहमद (१८) हा त्याचे दोन भाऊ, दोन काका आणि आई-वडिलांसोबत राहत होता. दुर्घटनेच्या आदल्या दिवशी या तिघा भावांचे आईवडील वैद्यकीय उपचारांसाठी गावी गेले होते. त्यामुळे ते दोघे जण सुदैवाने बचावले. सय्यद आणि त्यांच्या दोन भावांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने एका सहा वर्षाच्या मुलाचे प्राणही वाचले आहेत. इमारत हलत असल्याचे मेहसन्निसा अत्तर या भाजीविक्रेत्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सय्यदला हाक मारली. सय्यद झोपेतून जागा झाल्यानंतर त्याचे दोन भाऊ आणि तो क्षणात इमारतीच्या बाहेर पडले. इमारतीच्या जवळच खेळत असलेल्या सहा वर्षाच्या मुलालाही वाचवल्याचे सय्यद सांगतो. मात्र आता इमारत कोसळल्यानंतर या तिघा भावांवर बेघर होण्याची पाळी आली असून महापालिकेने त्यांची साधी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय देखील उपलब्ध करून दिलेली नाही. घटना घडल्यानंतर पालिकेचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावून अनेक ओशासने दिली, मात्र दुसर्‍या दिवशी कोणीच या ठिकाणी फिरकलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे काहींना जेवण देखील उपलब्ध झाले नव्हते. महापालिकेने निवार्‍याची सोय उपलब्ध न करून दिल्यामुळे याच इमारतीमध्ये राहणार्‍या इन्साफ अन्सारी , त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीला एका पत्र्याच्या शेडमध्ये संपूर्ण रात्र काढावी लागली. सकाळी तरी निवार्‍याची सोय उपलब्ध होईल अशा आशेने डोळे लावून बसलेल्या या कुटुंबीयांची दुसर्‍या दिवशीही निराशाच झाली. ज्या ठिकाणी रात्र काढली ती शेड देखील त्यांना खाली करावी लागणार आहे . त्यामुळे जायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. महापालिकेने मात्र नागरिकांनीच रात्र निवार्‍यामध्ये जाण्यास नकार दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांना निवारा नाही त्यांच्या निवार्‍याची सोय उपलब्ध असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. एकमेव शौचालय तुटले विशेष म्हणजे नई बस्ती या परिसरात असलेले एकमेव सार्वजनिक शौचालयही या दुर्घटनेत तुटले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये राहणार्‍या हजारो नागरिकांचा आता शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सात ते आठ शौचालयाचे ब्लॉक्स तुटले असून उर्वरित धोकादायक स्थितीमध्ये आहेत. दुसरा शौचालयाचा पर्याय १५ ते २० मिनिटावर असल्याने निवार्‍याबरोबरच आता नागरिकांना शौचालयाचा प्रश्न देखील भेडसावत आहे.