प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षा

डोंबिबली,दि.६(वार्ताहर)-मुजोर रिक्षाचालकांवर अंकुश लावण्यासाठी रामबाण उपाय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरुणांची फळी तयार झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ग्रुप तयार करण्यात आला असून या माध्यमातून मुजोर रिक्षा चालकांना धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील डीएनसी विभागातील काही तरुण एकत्र येऊन प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षा या नावाने सोशल मीडियावर व्हाट्स ऍप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी एक पेज तयार करण्यात आले आहे. ज्यांना या ग्रुपमध्ये यावयाचे आहे त्यांनी दिलेल्या साईडवर सदस्य व्हायचे आहे. आजपर्यंत सुमारे शंभरावर सदस्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या रविवारी सहभागी झालेल्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बैठक प्रथम प्राथमिक स्वरूपाची असून रिक्षा विषयावर सखोल चर्चा होणार आहे. मुख्य म्हणजे या विषयाला राजकीय स्वरूप न देण्याचा प्रयत्न असणार आहे. रिक्षा चालकांचे वाली म्हणून ओळख दाखविणार्‍या त्यांच्या युनियन मुजोर रिक्षा चालकांची पाठराखण करतात अशाही चर्चा होत आहेत. या सर्व गोष्टीना साथ मिळते ती वाहतूक पोलिसांची. वाहतूक कोंडी झाली तरी चालेल पण चिरीमिरीचा धंदा झालाच पाहिजे अशी रास्त समजूत वाहतूक पोलीसांची आहे असे ठाम बोलले जाते. पण आता नवतरुणांना अनेक माध्यमे हाती आली असल्याने तरुणाई स्वस्त बसणार नाही. याचाच भाग म्हणून प्रोटेस्ट अगेन्स्ट रिक्षा ही व्हाट्सऍप कार्यरत झाला आहे.