पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे सानपाड्यात एकाचा मृत्यू

नवी मुंबई,दि.२३(वार्ताहर)-रेल्वे स्थानकावर काही विपरीत घडू नये किंवा गरजू प्रवाशांना मदत व्हावी यासाठी जीआरपी कॉन्स्टेबल आणि होमगार्ड यांची भरती केली जाते. त्यांनीच असंवेदनशीलता दाखवल्यामुळं एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकावर २१जुलैच्या मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. एक व्यक्ती सानपाडा स्थानकावर धावत्या ट्रेनमधून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. त्यानंतर एक जीआरपी कॉन्स्टेबल आणि होमगार्ड तिथं दाखल झाले. त्या जखमी प्रवाशाला त्यांनी तडफडताना पाहिलं पण प्रथोमपचार करण्याचीही संवेदनशीलता या दोघांनी दाखवली नाही. त्याच्यावर उपचार न करता मागोमाग आलेल्या १.१५ च्या पनवेलकडं जाणार्‍या ट्रेनमधे ढकलून दिलं. ती ट्रेन पुढे पनवेलमधे यार्डमध्ये गेली. दुसर्‍या दिवशी २२ जुलैला दुपारी सफाई कर्मचार्‍याला ट्रेनमध्ये तो जखमी तरुण आढळला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिथं त्याला मृत घोषित केलं. ही असंवेदनशील घटना स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून असंवेदनशीलता दाखवणार्‍या होमगार्डला बडतर्फ करण्यात आलं आहे, तर कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे.