पिस्तुलधारी गुंडांना धाडसी डोंबिवलीकरांनी पकडले !

कल्याण,दि.3(वार्ताहर)-ज्वेलर्स व्यापार्‍यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी नागरिकांनी धाडस दाखवत दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रोडवर गावदेवी मंदिर परिसरात रमेश गोल्ड नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाचे मालक रमेश नाहर हे गुरुवारी रात्री दुकान बंद करून आपला मेव्हणा प्रदीप नाहर आणि दोन मॅनेजरसह घरी निघाले होते. घरी जात असताना प्रदीपवर अचानक दोन जणांनी हल्ला केला. यावेळी प्रदीप यांच्याकडे असलेली बॅग हिसकावण्याचा पयत्न हल्लेखोरांनी केला. दरम्यान प्रदीपवर गोळीबारही करण्यात आला, मात्र सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. झालेल्या झटापटीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. हा सगळा प्रकार पाहून प्रदीप आणि रमेश नाहर यांनी आरडाओरडा केला. आसपासच्या नागरिकांनी धाडस दाखवत लुटारुंच्या दिशेने धाव घेत दोन्ही लुटारूंना पकडून बेदम चोप दिला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सागर दिवटे यांनी त्वरित आरोपींना पकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी या दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. गेल्या काही महिन्यात डोंबिवलीत अशाप्रकारच्या घटना वाढत असून पोलिसांनी या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापारी करत आहेत.