पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचे ठिय्या आंदोलन

अंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-आठवड्यातून एक दिवस सुरु असलेली पाणी कपात भरीसभर म्हणून अपुर्‍या आणि अनियमित वेळेमध्ये होणार्‍या पाणीपुरवठ्यात ताबडतोब सुधारणा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबरनाथला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, विस्कळीत पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याचे अधिकार्‍यांचे ओशासन घेऊनच आंदोलन मागे घेण्यात आले. येथील कानसई विभागात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई भेडसावते, तोडगा निघावा यासाठी मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या कर्तृत्वाखाली आज शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी पाणी कार्यालय गाठले आणि घोषणाबाजी करत कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस.कोळी आणि अधिकारी चांदेकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. अंबरनाथला आठवड्यातून दर सोमवारी एक दिवस पाणी कपात लागू करण्यात आली आहे, याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत आणि अनियमित होत असून पाणी खात्याचा अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे कानसईकराना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे कुणाल भोईर यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले. कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ठिय्या आंदोलनात प्रशांत भोईर, विजय इंगळे, अनंत सागवेकर, जपेश भोईर, आशिष भोईर, सुमित ठाकरे आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पाणी वितरणातील तांत्रिक दोष दूर करून कानसईकराचा पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील असे कार्यकारी अभियंता ए.एस. कोळी यांनी सांगितले.