पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली

कल्याण,दि.१(वार्ताहर)-बकरी ईदनिमित्त तब्बल सात हजार बकर्‍यांची कुर्बानी दिली जाणार असून मुंबईला झालेल्या मुसळधार पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली आहे. तर आवक कमी झाल्याने बकर्‍यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कल्याण-भिवंडी रोडवरील दुर्गाडी पुला नजीक असलेली कोन गावातील बकरी मंडई ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बकरी मंडई आहे. या मंडईत मुंबई, ठाणे, आणि ग्रामीण परिसरातील मुस्लीम नागरिकांनी आणि विक्रेत्यांनी बकरी ईदसाठी बकरे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली आहे. शनिवारी बकरी ईद असल्याने आठवडाभरापासून या बकरी मंडईत बकरे खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ होती. कल्याण-भिवंडी रोडला असलेल्या कोनगावच्या बकरी मंडईत आठवड्यातून तीन दिवस हा बकरी बाजार भरत असतो. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम बकर्‍यांच्या संख्येवर झाला असून यंदा बकर्‍यांची आवक घटली आहे. मागील वर्षी हीच आवक १४ हजार बकर्‍यांची होती तर पावसामुळे हि संख्या निम्म्यावर आली असून यंदा आठवडाभरात सात हजार बकर्‍यांची आवक झाली आहे. आवक घटल्याने त्याचा परिणाम बकर्‍यांच्या किमतीवर झाला असून जो बकरा मागच्या वर्षी ८ ते १० हजारांना मिळत होता त्याची किमंत यावेळेस १५ हजार आहे. कुर्बानीचा बकरा यावेळेस १० हजारांच्या पुढे विकला गेला असल्याची माहिती हनीफभाई बकरी बाजार ट्रस्टचे सचिव संजय उकिर्डे यांनी दिली.