पावसाचा धुमाकूळ

ठाणे,दि.10(वार्ताहर)-पावसाचा जोर कायम असून संततधार पावसामुळे राबोडी येथील एक सरंक्षक भिंत कोसळून चार गाड्यांचे तर कळवा येथे नाल्याची भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एक महिना अगोदरच पावसाने दोन हजार मिमीचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी आतापर्यंत एक हजार मिमी जास्त पाऊस पडल्याने ठाणेकरांची दैना उडाली आहे. शहरातील अनेक सखल भागात आजही पाणी तुंबल्याने ठाणेकरांची तारांबळ उडाली होती. तर अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मागील तीन चार दिवस सतत कोसळणार्‍या पावसाचा काल रात्रीपासून जोर वाढला होता. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत 104.36 मिमी पावसाची नोंद झाली होती. पहाटे 5 वाजेपर्यंत शहरात 161.66 मिमी पावसाची नोंद झाली होती. संततधार कोसळणार्‍या पावसामुळे राबोडी येथील पंचगंगाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या कोकणी कब्रस्तानची 30 फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत भिंतीजवळ पार्क केलेल्या चार मोटार सायकल आणि एका रिक्षाचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने मदतकार्य केले. कळवा पूर्व भागातील घोलाईनगर येथील एका नाल्याची भिंत कोसळून काठावर असलेल्या दोन घरांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात 186.92 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरही पावसाचा जोर कायम होता. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 47 मिमी पावसाची नोंद झाली होती. दुपारपर्यंत शहरात 2046 मिमी पाऊस झाला होता. घोडबंदर मार्ग, वंदना सिनेमा, राममारुती रोड, कळवा, मुंब्रा, कौसा या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी तुंबले होते. आज जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषद आणि ठामपाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.