पाण्याच्या टाक्या ओसंडून; रुग्णालय पाहत नाही ढुंकून

ठाणे,दि.११(वार्ताहर)-शासनाकडून वारंवार पाणी वाचवण्याबाबत प्रबोधन केले जात असले, तरी शासकीय यंत्रणाच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते जिल्हा शासकीय रुग्णालयातील विविध वॉर्डांसाठी असणार्‍या टाक्यांचे व्यवस्थापन करणारा कर्मचारीच जागेवर राहत नसल्याने या टाक्या ओव्हरफुल्ल होऊन त्यातून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहण्याचा प्रकार घडत आहे. सिव्हिल रुग्णालयाच्या शेजारील इमारतीत राहणारे कृष्णा केतकर हे २०१४ पासून ठाणे सिव्हिल रुग्णालयातून होणार्‍या पाण्याच्या अपव्ययाबाबत रुग्णालय अधिकार्‍यांकडे तक्रार करत आहेत. या तक्रारीकडे आजवर लक्ष न दिल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीतील कॅज्युलटी, सिव्हिल सर्जन कार्यालय, इमर्जन्सी, प्रायव्हेट रूम, किचन, औषध भांडार, आयसीयू, फिमेल सर्जिकल, पीएनसी, लेबर, एनआयसीयू, ऑपरेशन थिएटर, जळीत कक्ष, फिमेल मेडिकल, मेल सर्जिकल, मेल मेडिकल, ट्यूब वॉर्ड, लहान मुलांचे वॉर्ड, आय वॉर्ड, आर्थो वॉर्ड, इन्फेक्शन वॉर्ड, टीव्ही वॉर्ड आहे. या सर्व वॉर्डला पाणी पुरवण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या विविध वॉर्डांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गच्चीवर टाक्यांची व्यवस्था असून, त्यात पाणी भरण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. या टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी असलेल्या विद्युत मोटारी सुरू करून कर्मचारी गायब होत असावा यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे पाण्याची टाकी ओव्हर फ्लो होऊन पाणी वाया जात असावे, परंतु मागील अनेक वर्षांपासून दररोज सकाळी आणि संध्याकाळी तासतास पाणी वाया जाते यावर वारंवार रुग्णालय प्रशासनाला तक्रार करुनही लक्ष दिले जात नाही. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. याबाबत शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता वॉटरफॉल बसवले असून लवकरच टाक्यांचे काम करून घेऊ असे सांगितले.