पनवेल येथे आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन

ठाणे,दि.30(वार्ताहर)-पनवेल येथे नुकतेच आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन पुण्याचे प्रिंसिपल चिफ कमिशनर अंशू जैन आणि ठाण्याचे चिफ कमिशनर आयकर नित्यानंद मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रिंसिपल कमिशनर आयकर, ठाणे, श्रीकृष्ण, प्रिंसिपल कमिशनर आयकर-3, ठाणे, वीर बिरसा एक्का, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, आयकर आयुक्त (अपील) डॉ.सुभाष चंद्र, आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच रायगड जिल्ह्यातील कर सल्लागार आणि अनेक करदाते, सीआरईडीएआय, एमसीएचआय, सिडको, आणि इतर व्यापार संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. केंद्राची इमारत निरनिराळ्या सुविधांनी नियुक्त आहे. कर देणार्‍या आणि कर सल्लागार मंडळींसाठी ग्रंथालय, लाऊंज, आणि कॅफेटेरिया आहे. नवीनच सुरू झालेले आयकर सेवाकेंद्र हे एक खिडकी संगणकीकृत सेवा आहे. एक्सलन्स इन सर्विस डिलिव्हरी हे या सेवा केंद्राचे बोधवाक्य आहे. यावेळी नित्यानंद मिश्रा म्हणाले की, आयकर विभाग करदात्यांचा आदर करतात, पण त्याचबरोबर कर चुकवणार्‍यांवर कारवाईही करतात. कर वसुलीसाठी नवीन पद्धतींचा वापर आयकर विभाग करीत आहे. करसंबंधित आकड्यांबद्दल आणि करामुळे होणार्‍या देशाच्या प्रगतीबद्दल अंशू जैन म्हणाले की, पनवेलमध्ये कर देणार्‍यांची वाढ 80% पेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये कर देणार्‍यांची वाढ लक्षणीय आहे. देशाच्या प्रगतीसाठी कराची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते. आयकर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.