पदवीधर मतदारसंघ कोणाच्या पारड्यात?

ठाणे,दि.13(वार्ताहर)-कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 8 जूनला होणार असून 12 जूनला निकाल जाहीर होणार आहे. येत्या मंगळवारी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात येणार आहे. दरम्यान सेना-भाजपातील वाढती दरी आणि आघाडीवर झालेले एकमत यामुळे कोकण मतदार संघात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाची मक्तेदारी 40 वर्षांनी मोडीत काढून सन 2012 मधील निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार ऍड.निरंजन डावखरे 27,733 मते मिळवून विजयी झाले होते. त्यांची मुदत 6 जुलै रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील शिक्षक मतदारसंघासह मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 15 मे 2018 रोजी अध्यादेश काढण्यात येणार असून 22 मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम मुदत आहे. 23 मे रोजी अर्जांची छाननी होईल तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 25 मे आहे. 8 जून रोजी मतदान होणार असून सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पदवीधर मतदारांना मतदान करता येणार आहे. 12 जून रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय कॉंग्रेस-राष्ट्रवादीने घेतला असून या पदवीधर मतदारसंघातही आघाडीचा उमेदवार देण्यात येणार हे निश्‍चित झाले आहे. शिवसेना-भाजपा युतीवर मात्र प्रश्‍नचिन्ह उभे आहे. राज्यातील लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने ताठ भूमिका घेऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर भंडारा मतदारसंघ भाजपाला आणि पालघर शिवसेनेला असा पर्याय उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. मात्र उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्याचवेळी युतीचे भवितव्य ठरणार आहे. या निर्णयावरच कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत युती होणार की नाही हे ठरणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून खर्‍या अर्थाने पदवीधर मतदारसंघाचा वर्ग गजबजणार हे निश्‍चित झाले आहे.