नोकर्‍याच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग?

नवी मुंबई,दि.5-जर सरकार नव्या नोकर्‍या निर्माण करणार नसेल तर आरक्षण मिळून देखील काय उपयोग होणार? असा उद्विग्न सवाल राज ठाकरे यांनी केला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी सडकून टीका केली. महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मोदी योगा करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या बातमीनुसार देशभरात एकूण 24 लाख जागा भरल्याच नाहीत. देशात नोटाबंदीनंतर सुमारे साडेतीन कोटी लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. एकतर जागा भरायला सरकारकडे पैसे नाहीत किंवा सरकारला काम करायचं नाही. जर सरकारी नवीन नोकर्‍या निर्माण होणार नसतील, तर आरक्षण मिळून देखील काय फायदा?, असा सवाल श्री. ठाकरे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे, त्यात जवळपास 7500 मराठी मुलांवर कलम 307 च्या खाली गुन्हे दाखल झाले आहेत. उद्या आरक्षण दिलंच तर या मुलांच्या नावावर गुन्हे आहेत म्हणून त्यांना नोकरी मिळणार नाही. मराठी मुलांची मनं भडकवायची, त्यांना रस्त्यावर उतरवायचं हे किती काळ चालणार आहे? असा संतापजनक सवालही त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर अटक झालेल्यांमध्ये परप्रांतीयदेखील होते, आंदोलन करताना महाराष्ट्र बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना केले. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांची गळचेपी सुरू आहे. माध्यमांच्या मालकांची मुस्कटदाबी सुरू आहे. भाजप जर माध्यमांची अशी गळचेपी करणार असेल तर कशाला आणीबाणीविरोधात बोलत होता? भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्या दोन दिवस आल्या. नंतर बंद झाल्या. एक बातमी झाकण्यासाठी दुसरी पेरायची हेच काम भाजप देशात करत आहे. देशावर हा हिप्नॉटिझमचे प्रयोग सुरू आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडपाच्या आकारावर आक्षेप नोंदवले आहेत. मग गणपती कपाटात बसवायचा का? हिंदू सणांवरच आक्षेप का? रस्त्यावर नमाज का होऊ दिला जातो? आम्हाला सायलेंस झोन शिकवला जातो मग मशिदीवरचे भोंगे का चालतात? असा प्रश्‍न श्री.ठाकरे यांनी केला.