नवी मुंबई विमानतळावरुन पुढच्या वर्षी पहिले टेकऑफ

नवी मुंबई, दि.१८(वार्ताहर)-‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन करत आहे. या भूमीला माझा प्रणाम,’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची मराठीतून सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन आणि जेनपीटीवरील चौथ्या टर्मिनलचं लोकार्पण करण्यात आले. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. दरम्यान, अरबी समुद्रातील शिवस्मारक लवकरच अवतरेल, असा दावाही मोदींनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक शक्ती आणि दूरदृष्टीचं स्मरण मोदींनी केले. त्याचबरोबर वेळेत कामे पूर्ण होणारी नवी संस्कृती आता रुजू होत असल्याचे सांगत, त्यांनी भाजप सरकारच्या कामांचे तोंडभरुन कौतुक केले. दरम्यान, या कार्यक्रमावर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र बहिष्कार टाकला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मोदींनी जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. जुन्या सरकारची संस्कृती ही लटकना, अटकना, भटकना अशी होती. त्यामुळेच जवळपास १० लाख कोटींचे प्रकल्प असेच अडकून होते. जे एनडीए सरकारने मार्गी लावले आणि त्यासाठी निधीची तरतूद केली. या सर्व प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे, नवी मुंबई विमानतळ हे त्यापैकीच एक आहे, असे मोदी म्हणाले. दरम्यान, हाती घेतलेले प्रकल्प याच सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होतील, असं ओशासनही मोदींनी दिले. या विमानतळाहून पहिले विमान २०१९ ला उड्डाण घेईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला. शिवाय येत्या काळात कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर दिला जाईल. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास केवळ ४० मिनिटात करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कसे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? ११६० हेक्टर जागेवर १६ हजार कोटी रूपये खर्चून विमानतळ उभारले जाणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचे वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०१९ ला पूर्ण होणार असून पहिले विमान टेकऑफ होणार आहे. सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करून त्यांना २०१४ च्या पुनर्वसन आणि पुनर्वसन स्थापना धोरण कायद्यानुसार नुकसान भरपाई आणि स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. एकूण १२ गावातील ३५०० कुटुंबांपैकी सध्या ५०० कुटुंबांचे इतरत्र स्थलांतरण करण्यात आले आहे. सिडकोने विमानतळाचे काम युध्दपातळीवर हाती घेतले असून दोन हजार कोटी रुपयांचे काम चार कंपन्यांना देण्यात आलं आहे. यामध्ये GVK Infrastructure, Gayatri Infra project, J M² Mhatre , TJPL यांचा समावेश आहे. डोंगराचं सपाटीकरण करणे, भराव टाकून जमीन सपाट करणे, नदीचा प्रवाह बदलणे, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं या कामांचा समावेश आहे. सिडकोने तीन टप्यात काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण करून रन वे आणि इमारत उभारून वर्षाला एक कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा आहे. दुसर्‍या टप्प्यात अडीच कोटी आणि २०२५ पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करीत एकूण सहा कोटी प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता या विमानतळाची असेल.