नऊ लाख कल्याणकरांनी थकवले महावितरणचे 10 कोटी

कल्याण,दि.5(वार्ताहर)-महावितरणच्या कल्याण परिमंडळात घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक असे एकूण सुमारे 28 लाख ग्राहक आहेत. त्यापैकी जून महिन्यात फक्त 19 लाख ग्राहकांनी चालू बिल भरले असून सुमारे 9 लाख ग्राहकांनी चालू बिल थकवले आहे. सध्या महावितरणचे चालू महिन्यात सुमारे 10 कोटी इतकी रक्कम थकली आहे. कल्याण परिमंडळात झालेल्या आढावा बैठकीत मुख्य अभियंता रफीक शेख यांनी दोन महिन्यांहून अधिक काळ चालू बिल थकवणार्‍या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहे. सध्या महावितरणमार्फत कल्याण परिमंडळामध्ये सुमारे 28 लाख 39 हजार ग्राहकांना वीजसेवा पुरवली जाते. या ग्राहकांतील जून महिन्यात एकूण वापरलेल्या विजेचे बिल सुमारे 870 कोटी रुपये होते. यांपैकी सुमारे 9 लाख ग्राहकांनी सुमारे 10 कोटी इतकी रक्कम थकवली आहे. याचबरोबर मे महिन्याचे चालू बिल थकवणार्‍या ग्राहकांवर जून महिन्यात कार्यवाही करण्यात आली असून यातील सुमारे 16 हजार ग्राहकांनी रिकनेक्शन चार्जेस भरून आपली वीज जोडणी पुन्हा करून घेतली आहे. म्हणूनच वाढत जाणारी थकबाकी लक्षात घेत कल्याण परिमंडळमध्ये पार पडलेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत मुख्य अभियंता रफीक शेख यांनी दोन महिन्याहून अधिक काळ चालू बिल थकवणार्‍या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिलिंग होण्यासाठी महावितरणने समांतर रीडिंग घेण्याचे काम सुरु केले आहे. याचबरोबर चालू बिल थकीत असणार्‍या ग्राहकाची वीज जोडणी तोडतानाही महावितरणच्या कर्मचार्‍यांमार्फत ग्राहकांचे रीडिंग घेतले जाणार आहे. यामुळे महावितरणला वीज जोडणी तोडलेल्या प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. याचबरोबर ग्राहकांना योग्य व अचूक बिल देणे शक्य होणार आहे. याचबरोबर महावितरणला मीटर रीडिंग घेणार्‍या कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक अधिकार्‍यांच्या टेबलचे ऑडीट करण्यात येत असून यामध्ये महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिनस्त कार्यालयांना अनपेक्षितपणे भेटी देत आहेत. या भेटीत ग्राहकांना पुरवण्यात येणार्‍या सेवांना आवश्यकतेपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकार्यावर नियमानुसार कार्यवाही होणार आहे.