धर्माने स्वतःला संपवले; सावित्रीबाईंचे काय होणार?

शहापूर,दि.३१(राजेश जागरे)-धुळ्यातील ८४ वर्षीय धर्माजी पाटील या शेतकर्‍याने अन्यायाविरोधात दाद मागत विषप्राशन करून मंत्रालयासमोर जीवन संपवले. तर शहापूरमधील सावित्रीबाई कदम या ९० वर्षीय आजीबाईने भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने उचललेल्या आमरण उपोषणाच्या अस्त्रामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गाच्या विरोधाची ठिणगी सर्वात प्रथम शहापूर तालुक्यात पडली असतांना देखील राष्ट्रीय महामार्ग ही देशाच्या विकासाची संपत्ती आहे. हे ओळखून समृद्धी महामार्गात बाधीत होत असूनही काही शेतकरी भूसंपादनाला संमत्ती देत आहेत. मात्र यापैकीच सकारात्मकतेने पुढे आलेल्या दळखन गावातील सावित्रीबाई बळीराम कदम (९०) यांनी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास खरेदीखताने संमत्ती देऊनही त्यांना भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांनी अखेर शहापूर तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. उपोषणास बसण्यापूर्वी त्यांनी समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी बाधीत शेतकर्‍यांविरोधी जाणीवपूर्वक लालफितीची भूमिका घेत असल्याचे आणि त्यातून सरकारी अधिकारीच समृद्धीच्या मार्गात खोडा घालत असल्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. ९० वर्षीय आजीच्या उपोषणाच्या इशार्‍याने शहापूर तालुक्यातील समृद्धी बाधीत शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली असून खरेदीखताने संमत्ती देऊनही मोबदला अडकविला जात असल्याचा गैरसमज येथे पसरु लागला आहे. तर सावित्रीबाई कदम यांच्या निमित्ताने बाधीत शेतकर्‍यांना भूसंपादन कर्मचार्‍यांकडून विचित्र अनुभव मिळत असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. दळखन गावातील सावित्रीबाई बळीराम कदम यांच्या मालकीहक्काची सर्व्हे आणि गट क्रमांक २२४ (ब) या वर्णनाच्या जमिनीचे १ एकर २६ गुंठे क्षेत्र समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात बाधीत होत आहे. महामार्गाच्या भूसंपादनाला होत असलेल्या शेतकर्‍यांच्या बर्‍याच विरोधानंतरही सावित्रीबाई यांनी शनिवार १३ जानेवारी रोजी भूसंपादनाला खरेदीखताने संमत्ती दिली. त्यावेळी या भूसंपादनाचा दोन कोटी ७६ लाख रुपये रक्कमेचा मोबदला दुसर्‍याच दिवशी बँकेच्या खात्यात आरटिजीएस पद्धतीने जमा होईल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात २० दिवस उलटूनही हा मोबदला दिला जात नसल्याने सावित्रीबाईंसह त्यांचे कुटूंबिय संतप्त झाले आहेत. या भूसंपादनापूर्वी मुंबईतील खाजगी विकसकाने घेतलेल्या हरकतींना त्यांना भिवंडी प्रांतअधिकार्‍यांच्या न्यायालयातही सामोरे जावे लागले होते. प्रांतअधिकार्‍यांचा लेखी निर्णय सावित्रीबाई यांच्या बाजुने मिळाला असतांना आणि हे सर्व सोपस्कार पार पाडूनही समृद्धीच्या भूसंपादन अधिकार्‍यांनी मोबदल्यापासून वंचित ठेवल्याने सावित्रीबाईंच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांना न्यायासाठी साकडे घालून शहापूर तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.