दूषित पाण्यामुळे झाला 25 जणांना अतिसार!

शहापूर,दि.5(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील तुते गावात दूषित पाण्यामुळे 25 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. शनिवारी रात्री गावातील नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने सर्व रुग्णांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात तीन लहान मुलींचा समावेश आहे. हिरामण पांढरे अत्यावस्थ झाल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीने साफसफाई न केल्यामुळे बोअरवेलमध्ये दूषित पाणी गेले आणि त्या बोअरवेलचे पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्या जुलाब होऊ लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या 25 रुग्णांमध्ये सात महिला, 15 पुरुषांचा तर 13, सहा आणि चार वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. रूपेश पांढरे, कल्पेश पांढरे, संजय पांढरे, रंजना पांढरे, ज्योत्स्ना पांढरे, निखिल पांढरे, अनंता पांढरे, जागृती पांढरे (6), नम्रता पांढरे (4), सुखदेव पांढरे, भगवान पांढरे, छगन पांढरे, वाडीबाई पांढरे, सोनु पांढरे, निलु पांढरे, पांडुरंग पांढरे, अलका पांढरे हे रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर तुते व आजूबाजूच्या परिसरातील गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने पावसाळ्याच्या सुरुवातीपासून बोअरवेलची साफसफाई न केल्यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित झाले. हे दूषित पाणी प्यायल्याने उलट्या जुलाब होऊ लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान शहापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या परिसरात पिण्याच्या पाण्यासह स्वछतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.