दिव्यात बेकायदा नळजोडण्या तोडल्या

ठाणे,दि.11(वार्ताहर)-दिवा येथील बेकायदा नळजोडणीच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जोरदार मोहीम उघडली असून आज एका दिवसात 67 नळजोडण्या तोडण्यात आल्याने पाणी माफियांचे धाबे दणाणले आहेत. दिवा येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असतानाच या परिसरात होणार्‍या पाणीचोरीबाबत भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी बेकायदा नळजोडणी विरोधात कारवाई करण्याचे महापालिकेला आदेश दिले होते. आज पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्या पथकाने दिवा प्रभाग समितीमधील दिवा आगासन रोड, सदगुरूनगर, ग्लोबल नाला, बेडेकरनगर आणि दिवा-शीळ य परिसरात धडक मोहीम सुरू केली आहे. तीन कार्यकारी अभियंता, दोन कनिष्ठ अभियंता आणि 25 कामगारांच्या मदतीने पोलीस बंदोबस्त न घेता दिवसभरात 67 अनधिकृत नळजोडण्या या पथकाने तोडल्या. ग्लोबल नाल्यात मोठ्या प्रमाणात या जोडण्या करण्यात आल्या होत्या. बेडेकरनगर, दिवा रोड या परिसरात खड्डे खोदून श्री.खडताळे यांच्या पथकाने या चोरीच्या नळजोडण्या शोधून काढल्या आहेत. या परिसरात तब्बल 665 बेकायदेशीरपणे नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांना नळजोडणी घेण्याकरिता महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात परंतु पाणीचोर मात्र दहा हजार ते एक लाखांत या बेकायदेशीर जोडण्या घेत आहेत. त्यामुळे प्रामाणिक करदात्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तर पाणी चोरांना मात्र मुबलक पाणी मिळते असा आरोप आ.केळकर यांनी केला आहे. महापालिकेच्या पथकाने आज पोलिसांच्या बंदोबस्ताशिवाय चोरीच्या नळजोडण्या विरोधात कारवाई केली. सोमवारपासून पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात नळजोडणी धारकांची तपासणी करून या चोरीच्या जोडण्या तोडण्यात येतील असे उपनगर अभियंता खडताळे यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चोरीच्या नळजोडण्या घेणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिले आहेत.