थीम पार्क घोटाळाः मनसेने घातले श्राध्द

ठाणे,दि.8(वार्ताहर)-जुने ठाणे नवीन ठाणे या संकल्पनेवर आधारित थीमपार्क प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पार्कच्या जागेतच प्रतिकात्मक श्राध्दविधी आंदोलन केले. या पार्कचे 25 जानेवारी 2014 रोजी निवडणुकीवर डोळा ठेऊन घाईघाईने भूमीपूजन करण्यात आले. परंतु गेल्या चार वर्षात कोणतेही काम झाले नाही. तरीही त्याचे पैसे अदा करून भ्रष्टाचार करण्यात आला. अडीच लाखाचे काम झाले असताना 16 लाखांचे बिल अदा करण्यात आले. असे अनेक प्रकार या प्रकल्पाच्या कामात झाले असून लाखोंचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केले. यावेळी स्थानिक शाखा अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी प्रशासनाचा निषेध करत मुंडण केले. आंदोलनात संदीप पाचंगे यांच्यासह पुष्कराज विचारे, सौरभ नाईक, किरण पाटील, सचिन सरोदे, दीपक जाधव, प्रमोद पाताडे, निलेश चौधरी, संतोष चांदणे, राकेश चव्हाण, संतोष माने, विवेक सावंत, चंद्रकांत दीक्षित, संतोष निकम, गोकूळ बोरसे, महेश चव्हाण, प्रशांत इंदुकाने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.