तारखा विकण्यासाठी नाटक कंपन्या काढतात-राज ठाकरे

ठाणे,दि.13(वार्ताहर)-महाराष्ट्रातील मराठी माणसाला चित्रपटाचे नाही तर नाटकाचे वेड आहे. नाट्यनिर्मिती करुन पोट भरणे चांगले पण काहीजण तारखा विकण्यासाठी नाटक कंपन्या काढतात, हे दुर्दैव आहे, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात सुरु असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते. रंगमंचावर येत असलेल्या अनेक नाटकांबद्दल असमाधान व्यक्त करून नाटकात संहिता आणि भव्यता आणण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी समोर बसलेल्यांना केले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष किर्ती शिलेदार यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. श्री.ठाकरे म्हणाले, नाट्यगृहे चांगली हवीत. नाटकातील गोष्ट चांगली हवी. पूर्वीचे दिवस आता नाहीत. आजच्या तरुणाईला जे अवती भोवती दिसते ते रंगमंचावर पहायला हवे आहे. नाटकाचे लेखक मिळत नाहीत अशी निर्मात्यांची तक्रार आहे. टीव्ही मालिका आणि चित्रपटाकडे लेखकांची पावले वळली आहेत.मुगल ए आझम नाटकाचे 500 रुपयाचे तिकिट काढून रसिक जातात. तिकिट दर वाढवा, पण नाटक चांगलं द्या, असे आवाहन केले. नाटके भरपूर येत आहेत पण त्यातील किती चालतात हे महत्वाचे आहे असे सांगून नाट्यकर्मींवर मोठी जबाबदारी आहे, असे मत श्री.ठाकरे यांनी व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राला नाटकाची आवड आहे. वैभवशाली परंपरा आहे. आजच्या पिढीने नाटक मोठं करावं. मी केंद्रीय मंत्री झाल्यावर तीन नाट्यगृहे बांधली. एक कवी मोरोपंतांच्या नावे, दुसरं गडकरींच्या नावे आणि एक माझे मोठे बंधू यांच्या नावे. ती उच्च दर्जाची आहेत हे तेथे जाऊन पहा, असेही श्री.पवार म्हणाले.