डम्पिंगच्या आगीमुळे साप नागरी वस्तींकडे

ठाणे,दि.१२(वार्ताहर)-आधारवाडी डम्पिंगला लागलेल्या भीषण आगीच्या झळा आणि धुराच्या कोंडमार्‍याने परिसरातील नागरिक हैराण आहेत. शिवाय या आगीमुळे निर्माण झालेल्या कोंडमार्‍याने झाडाझुडपांचा आश्रय घेऊन राहणार्‍या विषारी सापांनी मानवी वस्त्यांकडे पलायन केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आधारवाडी डम्पिंग भागातील महापालिकेच्या पार्किंग प्लाझा परिसरात डम्पिंगची आग विझविण्यासाठी रविवारी अग्निशमन दलाचे फायरमन दिनेश कोयंडे दाखल झाले होते. त्यांना काल दुपारच्या सुमारास कचर्‍यातून नाल्यामध्ये जाणारा भलामोठा नाग दिसला. त्यांनी तत्काळ सर्पमित्राला याबाबत माहिती देताच लगेचच सर्पमित्र दत्ता बोंबे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर सुमारे साडेपाच फुटाच्या विषारी नागाला पकडले. या नागाला सध्या कल्याणच्या अग्निशमन कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. नाग आढळल्याची दुसरी घटना ही वाडेघर परिसरातील रौनक सिटी या गृह प्रकल्पामध्ये घडली. या प्रकल्पाच्या कार्यालयात रविवारी सायंकाळच्या सुमाराला नाग शिरल्याचे एका कामगाराने पहिले. त्यानंतर येथील कामगारांनी सर्पमित्र हितेशला फोन करून याबाबत माहिती दिली. वेळीच सर्पमित्र हितेश घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाच फुटाच्या या विषारी नागाला अवघ्या काही मिनिटात पकडले. नागाला पकडताच येथील कामगारांनी सुटकेचा निेशास टाकला. तिसर्‍या घटनेत हिरवा रंगाचा दुर्मिळ हरण टोळ जातीचा साप कल्याणच्या आरटीओ कार्यालयाशेजारी असलेल्या श्री कॉम्प्लेक्समधील एका झाडावर रहिवाशांना आढळून आला होता. त्यानंतर हा साप झाडावरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे कृष्ण सोहम यांच्या बाल्कनीत शिरला. घाबरलेल्या रहिवाशांनी तात्काळ याची माहिती सर्पमित्राला दिली. सर्पमित्राने मोठ्या शिताफीने या सापाचा शोध घेत सापाला पकडले. हा पकडलेला साप निम विषारी असून त्याची लांबी सुमारे साडेपाच ते सहा फुट होती. या सापाला कल्याणच्या अग्निशमन कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर डम्पिंगला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मात्र पालिका प्रशासनाने यावर आजतागायत ठोस उपाययोजना न केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही हे सत्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. उन्हात कचरा तापतो. या कचर्‍यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेटतो. परिणामी आग लागून धुराचे प्रचंड प्रमाणात लोट उठतात. आग लागताच मोठ्या प्रमाणावर वाहणार्‍या वार्‍यांमुळे आगीचा धूर वार्‍याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो. आगीचे प्रमाण जास्त असेल तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, गौरीपाडा, पौर्णिमा चौक, शिवाजी चौकापर्यंत पसरत जातात. त्यामुळे तेथील रहिवाशांना ेशसनाच्या आजारासह इतर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आधारवाडी डम्पिंग परिसर खाडी लगत असल्याने या भागात झाडेझुडूपेही मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे विषारी आणि बिनविषारी सापांचा वावर या परिसरात आहे. डम्पिंगला लागलेल्या आगीचा झळा या सापांना देखील बसत असून हे साप नागरी वस्त्यांकडे पलायन करत आहे. ठिकठिकाणी सापडत असलेले हे विषारी साप सर्पमित्रांच्या मदतीने पकडण्यात येत असून या सापांना जंगलात सोडण्यात येणार आहे.