ठामपा विरोधात आरटीआय कार्यकर्ते जाणार न्यायालयात

ठाणे,दि.१२(वार्ताहर)-माहिती अधिकार कार्यकर्ते आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वाद विकोपास गेला आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात आरटीआय कार्यकर्त्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. माजी नगरसेवकांसह ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची नावे पोलिसांकडे पाठवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्या सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त, ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांच्या विरोधात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत, अनधिकृत बांधकामांबाबत तसेच पालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत माहिती मागवण्यात येत असल्यानेच पोलिसांकडे माहिती अधिकार कार्यकर्त्यांची नावे पाठवून अशा कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा याचिका करणार्‍या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा आणि ठाणे महापालिकेच्या सभागृहात चर्चा झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संदर्भात पालिका प्रशासनाकडून एक समिती नेमण्यात आली होती. पालिकेने नेमलेल्या समितीने आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत.त्यानंतर आता या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची भूमिका ही संशयित आणि ब्लॅकमेलींग स्वरुपाची वाटत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. त्यानुसार या प्रकरणात सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महापालिकेने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आता याचे उलटे पडसाद शहरात उमटू लागले असून माहिती अधिकारात माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील विसंगती उघड करीत असल्यानेच ही कारवाई होत असल्याचा गौप्यस्फोटही या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान महापालिकेच्या या भूमिकेविरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे. अनेक वेळा अनधिकृत बांधकामांबाबत आवाज उठवला असून त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत पालिका प्रशासनाने काय कारवाई केली याची विचारणा याचिकेत करण्यात आली आहे. अशा प्रकारे माहिती अधिकार कार्यकर्त्यांची नावे पोलिसांकडे देऊन त्यांचे सामाजिक कार्यच धोक्यात आले असल्याचे या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.