ठामपा अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणार!

ठाणे,दि.११(वार्ताहर)-महापालिकेच्या विविध विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये आमुलाग्र बदल व्हावा, निश्चित केलेले उदिष्ट प्रभावीपणे अंमलात यावे आणि त्या माध्यमातून अधिकार्‍यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी प्रत्येक विभागाने तयार केलेल्या चार महिन्यांच्या कृती आराखड्याचा आढावा आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. अधिकार्‍यांनी आपल्या कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आदेश श्री.जयस्वाल यांनी दिले. आज दुपारपासून नागरी संशोधन केंद्र येथे प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची उदिष्टे आणि ती साध्य करण्यासाठी केलेले नियोजन, नवीन संकल्पना आदीबाबत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम, प्रदूषण नियंत्रण विभाग, पाणी पुरवठा विभाग, शहर विकास विभाग, जाहिरात, क्रीडा, माहिती व जनसंपर्क, स्थावर मालमत्ता, सामान्य प्रशासन, परिवहन सेवा आदीसह जवळपास सर्वच विभागांनी आपला चार महिन्यांचा कृती आराखडा सादर केला. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकार्‍यांनी सादर केलेल्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने दर महिन्याला आयुक्त स्तरावर आढावा घेण्यात येईल असे सांगितले. तथापि विभाग प्रमुखांनी सदर कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत दर आठवड्याला आढावा घ्यावा अशा सूचना अधिका-यांना दिल्या. त्याचप्रमाणे सर्व अधिका-यांनी कृती आराखड्याच्या अनुषंगाने सतर्क राहून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे आदी उपस्थित होते.