ठाण्याचा पारा ४१ अंशावर

ठाणे, दि.12(वार्ताहर)-हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत आज ठाणे शहरात तापमानाचा पारा 41 अंशावर चढला. त्यामुळे दुपारपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड उकाड्याने ठाणेकर हैराण झाले. यंदा राज्यात तापमान एक अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार फेब्रुवारीपासूनच प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. 26 ते 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला ठाण्यात तापमानाने चाळीशीचा पार गाठला होता. 4 मार्चपर्यंत हे तापमान चाळीशीला धरूनच होते. मात्र गेल्या आठवड्यातील पार्‍याने चार अंशाने उसळी घेतली. आज सोमवारी कमाल तापमान 41 अंश एवढे नोंदले गेले. सकाळपासून उकाडा सहन करणारे ठाणेकर दुपारी मात्र प्रचंड हैराण झाले. वृध्दांनी घराबाहेर जाणे टाळले. तर महिला-मुलांनी रुमाल आणि टोप्या वापरूनच घराबाहेर पडणे पसंत केले. वातावरणातील उकाडा यापुढे वाढतच जाणार असून संसर्गजन्य आजारांना पूरक वातावरण तयार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.उगाच बाहेर जाणे टाळावे, अधूनमधून पाणी प्यावे, वृध्दांना आणि मुलांना बाहेर पडण्यापूर्वी उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून पालकांनी योग्य काळजी घ्यावी अशा सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केल्या आहेत.