ठाणे महापालिकेला ऍपघात!

ठाणे,दि.13(वार्ताहर)-स्मार्ट सिटी असलेल्या ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्याकरिता तयार केलेले सर्व ऍप्स सध्या बंद आहेत. त्यामुळे एकाही नागरिकाची ऑनलाईन तक्रार महापालिकेकडे नोंदवली जात नसल्याने स्मार्ट सिटीच्या नावाने ठाणेकर बोंब मारू लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेने विविध समस्यांच्या तक्रारी तात्काळ करता याव्यात यासाठी ऍप्सची निर्मिती केली आहे. कचरा साचला असेल तर त्याची तक्रार ऑनलाईन करता येत होती. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या खड्ड्यांची तक्रार ऑनलाईन करता यावी यासाठीही टार्गेट हे ऍप तयार करण्यात आले होते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. शहरातील नागरिकांच्या सोयीकरता डीजी ऍपही कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून हे ऍप बंद पडले आहेत. नागरिकांना त्यांची तक्रार करता येत नाही. या ऍपबाबत महापालिकेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याला काहीच माहिती नाही. त्या ऍपचे साधं नावही त्याला सांगता येत नाही. करोडो रुपये खर्च करून विविध योजना आणि तक्रारींकरिता निर्माण केलेले ऍप सध्या बंद असल्याची खात्री भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी केली आहे. त्यांनी ऍपद्वारे ऑनलाईन तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु हे ऍपच बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महापालिकेच्या संदर्भात विविध तक्रारी नोंदवण्याकरिता टार्गेट हे ऍप होते. त्याचे अपग्रेडेशन केले जात असल्यामुळे हे ऍप सध्या डाऊन करून ठेवण्यात आले आहेत. चार ते पाच दिवसात त्याचे अपग्रेडेशन झाल्यानंतर हे ऍप सुरू होतील असा विश्‍वास संगणक विभागाचे प्रमुख स्वरुप कुलकर्णी यांनी सांगितले. तर स्वच्छतेचा एमओएचयु हे ऍप केंेद्र सरकारचे आहे, त्याचे संचलन केंद्र सरकारमार्फत केले जात आहे. ते ऍप सुरू असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिेकारी डॉ.बालाजी हळदेकर यांनी सांगितले.