टीएमटीला मिळाला मेट्रोचा पर्याय

ठाणे,दि.११(वार्ताहर)-चांगली प्रवासी सेवा न देऊ शकलेल्या टीएमटीला आता अंतर्गत मेट्रोचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाण्यातून जाणार्‍या मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी ही अंतर्गत मेट्रो व्यवस्था महत्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे ठाण्यातील महत्वाचे अंतर्गत भाग जोडले जाणार असून अंतर्गत वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. यासंदर्भातील फिसिबिलीटी अहवाल या आठवड्यात येणार असून त्यानंतरच प्रत्यक्ष या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. वागळे, पोखरण रोड नं १ आणि २ तसेच मानपाडा परिसरातील केवळ टीएमटीवर अवलंबून असणार्‍या प्रवाशांना खर्‍या अर्थाने या अंतर्गत मेट्रोचा फायदा होणार आहे. प्रवासी सेवा सुधारण्यासाठी ठाणे परिवहनसेवेमध्ये सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न परिवहन प्रशासनाकडून सुरु आहेत. बसेसची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. मात्र तरीही प्रवासी या सर्व सुधारणांनी समाधानी नाहीत. भविष्यात ठाण्यातून मेट्रो जाणार असली तरी, त्याआधीच अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. २०१३ पासून एलआरटी सुरु करण्याची घोषणा करण्यात येत आहे. मात्र एलआरटी आता केवळ दिवास्वापच ठरले असून त्याचा अनुभव मात्र अंतर्गत मेट्रोच्या माध्यमातून ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. एलआरटीच्या आधी १९९९ साली महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्ट रुट) चा मार्ग मंजूर केला आहे. रिंग रुट पध्दतीने या मार्गावरुन प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणो नागरिकांना शक्य होणार आहे. या रुट्ससाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. तर सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमीनीवर अतिक्रमण आहे. शिवाय काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे. परंतु मार्ग निश्चित करण्यात आल्याने प्रवासासाठी नक्की कोणते साधन योग्य ठरणार याचा निर्णय झाल्यानंतर या मार्गावर काम करणो महापालिकेला शक्य होणार आहे. त्यानुसार आता अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. महासभेची देखील आता मंजुरी घेण्यात आली असून महामेट्रो कंपनीकडून सर्व्हेचे काम सुरु झाले आहे. त्यानुसार आता फीजीबीलीट अहवाल आता अंतिम टप्यात आला असून तो पुढील आठवड्यात ठाणो महापालिकेला सादर केला जाणार आहे. या अहवालावरच ही अंतर्गत मेट्रो कितपत किफायतशीर आहे, याची माहिती होणार आहे. त्यानंतर लागलीच हा अहवाल महासभेच्या मान्यतेसाठी पटलावर ठेवला जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. या सर्व्हेसाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागातील पादचारी पूल-सबवे या लेखाशिर्षाकामधून वर्ग करण्यात येणार आहे. या अहवालानुसार कोणत्या ठिकाणी किती बांधकामे बाधीत होणार आहेत, कोणत्या ठिकाणी आरक्षण बदलण्याची गरज आहे, आदींसह इतर माहिती मिळणार आहे. त्यानुसारच पुढील धोरण ठरविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान अंतर्गत मेट्रो सेवेचा शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांना फायदा होणार आहे. या भागातील लोकवस्ती वाढत असल्याने त्यांना या किफायतशीर वाहतुकीचा फायदा होणार आहे. शिवाय प्रस्तावित मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्थानकाला हा मार्ग जोडता येणो शक्य असल्याने ठाणेकरांसाठी अंतर्गत मेट्रो हा टीएमटीला चांगला पर्याय ठरणार आहे.