टाेईंगवरुन पाेलीस आणि वृध्दाची हाणामारी

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-दुचाकी टोइर्ग करण्यावरून वाहन चालक आणि टोइर्ग कर्मचार्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतच असून आज उल्हासनगरमध्ये याच कारणावरून वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3च्या मोबाईल मार्केट रस्त्यावर आज हा प्रकार घडला. आपण समोर असतांना आपली दुचाकी उचलून ती टाेइंग गाडीमध्ये टाकण्यात आल्याचे जवाहर लुल्ला या ज्येष्ठ नागरीकाचे म्हणणे आहे. याचा जाब वाहतूक पाेलीसाला विचारला असता वाहतूक पाेलीस आणि त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लुल्ला यांना उपचारार्थ शासकीक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पाेलीस ठाण्यात वाहतूक पाेलिसविराेधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.